वाईन शॉपच्या कर्मचार्‍यानेच लांबवला दीड लाखाचा ऐवज

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मोंढा नाका येथील मेट्रो वाइन शॉपमध्ये कर्मचार्‍यानेच मध्यरात्री मालकाच्या ऑफिसमध्ये चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यात आले. जवाहरनगर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातुन एलइडी टीव्ही, मोपेड व चोरीची मोटार सायकल असा एकुण १ लाख ६४ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक केली.  अजय गौतम मोटे (२२) असे आरोपीचे नाव आहे. 
फिर्यादी निल जराड डिसुजा (वय-३०, रा. आकाशवाणी) यांनी फिर्याद दिली. २८ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास वाईन शॉपच्या वर असलेल्या ऑफिसमध्ये तीन जणांनी चोरी करून ऐवज लंपास केला. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बघुन आरोपीबाबतची अधिक माहीती घेतली असता सदरचा इसम हा मुळचा गायकवाड वस्ती श्रीरामपुर (जि. अहिल्यानगर) येथील असून, तो मुकुंदवाडी येथे रूम करून राहत होता. पोलिसांनी छापा टाकताच आरोपीने पळ काढला. काही अंतरावर पाठलाग करून त्यास पकडण्यात आले असून त्याने चोरीची कबुली दिली. दि. १३ रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान अधिक चौकशी केली असता चोरी केलेला मुद्देमाल हा त्याने मुकुंदवाडी येथील रुमवर ठेवला होता. त्याने काष्ठी (ता. श्रीगोंदा) येथुन स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची मोपेड ही १० हजार रुपयामध्ये विकत घेतली. त्याच्या ताब्यातून मोपेड, मोटारसायकल असा एकुण १ लाख ६४ हजार ४९० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुचाकीबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ही  कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ चे प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त मनोज पगारे, वरिष्ट पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट मार्शलचे सहा. फौजदार रमेश जाधव, अंमलदार मारोती गोरे, पोह उईके यांनी केली.